पुणे : पुणे आणि नाशिक येथे ६-७ बनावट कंपन्या सुरू केल्या. त्यात कोणताही व्यवसाय न करता वेगवेगळ्या लोकांना १३० कोटी रुपयांची बनावट बिले देऊन आर्थिक व्यवहार केला. तसेच शासनाचा १९ कोटी ७९ लाख रुपयांचा राज्य कर (इनपुट टॅक्स क्रेडिट) बुडवल्याप्रकरणी पुण्यातील राज्य कर विभागाने एका कंपनीचा संचालक ओमप्रकाश सचदेव याला अटक केली. न्यायालयाने त्याची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पुणे राज्य कर अन्वेषण तपास पथकाने येरवडा येथील राज्य कर कार्यालयात गुरुवारी ही कारवाई केली आहे. ओमप्रकाश सचदेव (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) असे ग्लोबल माईन्स प्रा. लि. कंपनीच्या अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे.
सहा-सात बनावट कंपन्या तयार केल्या. काहीच धंदा न करता तो वेगवेगळ्या लोकांना बनावट बिले देऊन आर्थिक व्यवहार करायचा. मार्च २०२१ पासून त्याला राज्य कर विभागाने वारंवार याबाबत कळवून तपासणीला बोलवले होते, पण तो आला नाही. त्यामुळे २२ जून २०२१ रोजी त्याला अटक करण्यात आली. येरवडा येथील कार्यालयात मागील तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. गुरुवारी चौकशीनंतर राज्य कर तपास पथकाने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याचा जामीन नाकारून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पुणे क्षेत्राचे अपर राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे, राज्य कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, उपायुक्त दिलीप देशमुख, सहायक आयुक्त बाबासाहेब झुंबड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
---
ओमप्रकाश सचदेव याने कोणताही व्यवसाय केलेला नाही. मात्र, १३० कोटींच्या बनावट खरेदीच्या बिलावर क्रेडिट घेतले. तसेच शासनाचा १९ कोटी ७९ लाख रुपयांचा महसूल बुडवला. ५ कोटींच्यावर खरेदीची बिले दिली आणि त्याचा महसूल बुडवल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार आम्ही कारवाई केली आहे.
- बाबासाहेब झुंबड, सहायक आयुक्त, पुणे राज्य कर क्षेत्र आणि तपास पथक वरिष्ठ अधिकारी