पुणे : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील सरासरी ४८ टक्के महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रमाण पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात सरासरी ६० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील १९ लाख महिलांची हिमोग्लोबिनतपासणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी ५ कोटींची तरतूदही केली आहे. आरोग्य आणि स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून घरातील, शेतातील, कार्यालयातील कामे रेटण्याची प्रवृत्ती महिलांना स्वत:च्या आरोग्यसाठी धोकादायक ठरत आहे. पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षयाचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. रक्तातले हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे विविध आजारांना त्यांना सामोरे जावे लागते़ ग्रामीण भागातील महिलांमध्ये हे रक्तक्षयाचे प्रमाण ६० टक्केपर्यंत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पुढाकार घेऊन १३ तालुक्यांतील सर्व महिलांची हिमोग्लोबीनची तपासणी व रक्तक्षय असणाऱ्या महिलांवर १०० दिवसांचे उपचार देण्याची ‘प्रतिभा आरोग्यसंपन्न योजना’ आखली आहे. ही तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार असून नुसती तपासणी न करता यात उपचारांचादेखील समावेश आहे.ही योजना समाजातील महिलांचे आरोग्य उंचावणारी ठरणार असून पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात मार्गदर्शक अशी असेल. यासाठी अर्थसंकल्पातही ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे १९ लाख महिलांची हिमोग्लोबीन तपासणी व १०० दिवसांचा औषधोपचार करण्यात येणार असून यासाठी तब्बल रक्कम रुपये २६ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. ५ कोटींची तरतूद केली असताना २६ कोटी खर्च अपेक्षित असलेली ही योजना कशी मार्गी लागणार, असे प्रदीप कंद यांना विचारले असता, आपल्याकडे देणारे हात खूप आहेत. फक्त सकारात्मक व लोकोपयोगी काम त्यांच्यापर्यंत योग्यरीत्या घेऊन जाता आले पाहिजे. लोकसहभागातून आपण हे शक्य करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ४८ टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण दर दहा वर्षांनी केले जाते. यात देशातील प्रत्येक राज्याची आरोग्य आणि पोषणाबाबतची स्थिती काय आहे, याचा अभ्यास यात केला जातो. यात १५ ते ४९ वयोगटातील गरोदर नसलेल्या ४८ टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक. याच वयोगटातील मात्र गरोदर असलेल्या ४९.३ टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक. तसेच ७.१ टक्के महिलांमध्ये अतिरिक्त तणावाची लक्षणे आढळून आली आहेत. या योजनेने महिलांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल व शरीर स्वस्थ व उत्तम राहील़ हिमोग्लोबीनअभावी होणारे दुष्परिणाम कमी होऊन आरोग्यसंपन्न जीवन राहील़ जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या मदतीने आपण हे शिवधनुष्य पेलण्याचे नियोजन करू.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद
१९ लाख महिलांची होणार हिमोग्लोबिन तपासणी
By admin | Published: March 29, 2016 3:29 AM