आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात पर्जन्यवृष्टी झाली. मात्र या मॉन्सूनपूर्व पावसाचा धरणसाठ्यात वाढ होण्यास काहीच उपयोग झाला नाही, सध्या धरणात १९. ७८ एवढा पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षीच्या तुलनेत तो जवळपास ५ टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात २३.५६ एवढा पाणीसाठा शिल्लक होता. सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुरता ओसरला आहे. सकाळ-संध्याकाळ येणारी पावसाची रिमझीम भातरोपे वाढीसाठी चांगली असली, तरी या पावसामुळे धरणसाठ्यात अजिबात वाढ होणार नसल्याचे चित्र आहे. त्या मानाने आहुपे, पाटण खोऱ्यात पावसाचे प्रमाण जरा जास्त आहे. आजपर्यंत या भागात ८४ मि.मी एवढा पाऊस झाला आहे. आज उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार डिंभे धरणात सध्या १९.७८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक असून पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाणलोटक्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा खालावल्याचे चित्र आहे. मात्र, पाणीसाठा खालवला असला, तरी लवकरच या भागात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.
डिंभे पी१ ओळी- डिंभे धरणात सध्या १९.७८ एवढा पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षीच्या तुलननेत तो जवळपास ५ टक्क्यांनी कमी आहे. (छायाचित्र-कांताराम भवारी)