लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल व सीए फाउंडेशन कोर्सचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. नवीन अभ्यासक्रमानुसार झालेल्या सीए परीक्षेत मध्य प्रदेशातील मोरेना येथील १९ वर्षांची नंदिनी अगरवाल हिने ७६.७५ टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकाविला. इंदूरच्या साक्षी एरन हिने ७६.६३ टक्के गुण मिळवून दुसरा आणि बंगलोर येथील साक्षी बाग्रेचा हिने ७५.६३ टक्के गुण घेत तिसरा क्रमांक मिळवला. देशातील एकूण ७ हजार ७७४ विद्यार्थी हे सीए (सनदी लेखापाल) होण्यासाठी पात्र ठरले आहेत.
आयसीएआयतर्फे जुलै २०२१ मध्ये सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षा घेण्यात आली. नवीन योजनेनुसार सीएच्या अंतिम परीक्षेंतर्गत ग्रुप-एकची परीक्षा ४९ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी दिली असून, त्यातील ९ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ग्रुप-दोनची परीक्षा एकूण ४२ हजार २०३ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील ७ हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २३ हजार ९८१ इतकी असून, त्यातील दोन हजार ८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
देशातील ७१ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी फाउंडेशन परीक्षा दिली. त्यातील १९ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा एकूण निकाल २६.६२ टक्के लागला आहे. त्यात मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी २६.०८, तर मुलींची टक्क्केवारी २७.२६ इतकी आहे.
भाऊ-बहिणीच्या यशाने आनंद द्विगुणित
देशात पहिली आलेली १९ वर्षांची नंदिनी अगरवाल हिचा २१ वर्षीय भाऊ सचिन अगरवाल हादेखील सीए परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. देशात त्याला १८ वा क्रमांक मिळाला आहे. माझा भाऊ सचिन आणि मी शालेय जीवनापासून एकत्र असून आम्ही दोघांनी अभ्यासदेखील एकत्रच केल्याचे नंदिनी हिने सांगितले.