पिंपरी : निसर्ग क्षेत्रात जनजागृती, शिक्षण व प्रत्यक्ष संवर्धन उपक्रमांतर्गत पक्षिप्रेमींनी केलेल्या पाहणीत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत केलेल्या पाहणीत सुमारे १९४ प्रजातींचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या ‘स्वस्तिश्री’ संस्थेने २००७ ते सप्टेंबर २०१४ या कालखंडात शहर परिसरातील निरीक्षणे नोंदविली आहेत. हौशी व अभ्यासू पक्षिनिरीक्षकांच्या नोंदीचे एकत्रीकरण करून पक्षिवैविध्याचा अभ्यास व दस्ताऐवजांचे एकत्रीकरण केले आहे. यात डोंगरी, पाणथळ, माळरान, शेती, मनुष्यवस्ती, बागा व उद्याने अशा विविध प्रकारच्या अधिवासात आढळणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे. यांपैकी वर्षभर स्थायिक असलेल्या १२९ प्रजातींची, हिवाळ्यात परदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या ४० प्रजातींचा समावेश आहे. त्यात स्थानिक स्थलांतर करणारे अडकित्ता, पांढरा अवाक, युवराज अशा एकूण ३ प्रजाती, पावसाळ्यात स्थलांतर करून येणाऱ्या वर्षा लावरी, पाऊस पियू, चातक आणि नवरंग या ४ प्रजातींची आणि याचबरोबर आपल्या अधिवासापासून भरकटलेल्या तिबोटी खंड्या, रोहित, लहान हिरवा तांबट अशा एकूण १८ भटक्या पक्ष्यांची नोंद झाली आहे.या नोंदीचा उपक्रम उमेश वाघेला यांच्यासह विश्वनाथ भागवत, दीपक सावंत, अनिल खैरे, संजय ठाकूर, चैतन्य राजर्षी, डॉ. भालचंद्र पुजारी, डॉ. सुधीर हासमनीस, प्रशांत पिंपळनेरकर आणि पीयूष सेखसरिया यांनी राबविला आहे.(प्रतिनिधी)