Maharashtra Cabinet Expansion: पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:31 IST2024-12-15T14:01:55+5:302024-12-15T14:31:45+5:30
भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मंत्रिपदासाठी इच्छुक होते

Maharashtra Cabinet Expansion: पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही
पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल १३ दिवसांनी मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्र्यांची निवड झाली. आता त्यांची निवड झाल्यावर १० दिवस होऊन गेल्यावर मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. पुण्यात किमान ५ मंत्री अपेक्षित असताना पुणे शहर व जिल्ह्यात ३ मंत्रीपदे सध्या देण्यात आली आहेत. शहरातून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना फोन आले आहेत. तर जिल्ह्यातून इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांना संधी देण्यात आली आहे. आज शपथविधी कार्यक्रम नागपूरला ४ वाजता होणार असून त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून सोमवारी (दि.१६) विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनास सुरूवात होणार आहे.
जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी फक्त वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापू पठारे व खेड-आळंदीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे वगळता सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. जुन्नर विधानसभेतून शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आलेत पण त्यांनी लगेचच शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे २१ पैकी १८ आमदार जिल्ह्यात आहेत. त्यातील ४ जणांना सध्यातरी मंत्रीपदे देण्यात आली आहेत.
ज्येष्ठतेमध्ये शहरात पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे नाव आघाडीवर होते. कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील पक्षात ज्येष्ठ आहेत, व त्यांचे मंत्रीपद फिक्स मानले जात होते. परंतु दत्ता भरणे यांचेही नाव चर्चेत होते. त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर दौंडमधील भाजपचे राहूल कूल यांचे नाव आघाडीवर होते. पिंपरी-चिंचवडमधील महेश लांडगे हेही इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांमध्ये स्वत: अजित पवार उपमुख्यमंत्री आहेतच. आंबेगावमधील या पक्षाचे आमदार दिलीव वळसे ज्येष्ठ आहेत. त्यांचे नाव ही फिक्स समजले जात होते. सत्तावाटपात अजित पवार गटाला सर्वात कमी मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात फार कोणाला संधी देतील असा सध्या तरी दिसून येत नाही. तीच परिस्थिती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची आहे. त्यांचे दोन आमदार (एक अपक्ष) जिल्ह्यात आहेत. त्यातील पुरंदरचे विजय शिवतारे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा आहे. परंतु त्यांनाही अजून फोन आलेला नाही.