पुणे : कॅन्सर (कर्कराेग) झाला म्हटले की पेशंटच्या पायाखालची वाळू सरकते. कॅन्सर बरा हाेईल की नाही, त्याच्या उपचारांचा लाखाेंचा खर्च परवडेल का? हे प्रश्न रुग्णांसमाेर यक्षप्रश्न म्हणून उपस्थित राहतात. कारण, सध्या कॅन्सर रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहेच. साेबत त्याचा लाखाे रुपयांचा खर्चही परवडत नाही. सरकारी रुग्णालयांचा आधारही शासनाच्या धाेरणामुळे ताेदेखील आता दुरापास्त झाला आहे. कारण, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून पुण्यातील ससून रुग्णालयासमाेरील सव्वा दाेन एकर जागेत सरकारी कॅन्सर हाॅस्पिटल उभारण्याचे उद्दिष्ट हाेते. मात्र, ही जागाच रस्ते विकास महामंडळाने बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातल्याने सरकारी कॅन्सर रुग्णालय उभी राहण्याची अंतिम आशाही मावळली आहे.
बदललेली जीवनशैली, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन, भाजीपाल्यांमध्ये हाेणारा कीटकनाशक, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, तंबाखूजन्य पदार्थांचा वाढता वापर, आदी कारणांमुळे वेगवेगळया अवयवांच्या कॅन्सरचे प्रमाण समाजात वाढत आहे. पूर्वी कॅन्सर हा पन्नाशीनंतर तसेच साठीनंतर व्हायचा. मात्र, आता ताे विशी-पंचविशीतही आला आहे. त्यापैकी महिलांमध्ये स्तन व गर्भाशयाचा, तर पुरुषांमध्ये ताेंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचा उपचारांचा किमान खर्चही हा पाच ते दहा लाखांच्या आसपास जाताे.
अशावेळी सर्वसामान्यांना ‘बुडत्याला आधार काडीचा’ या म्हणीप्रमाणे असताे ताे सरकारी कॅन्सर रुग्णालयांचा. परंतु, पुण्यात कॅन्सरवर स्वतंत्रपणे उपचार करणारे एकही सरकारी हाॅस्पिटल नाही. ससून रुग्णालयात फारच जुजबी जसे केमाेथेरपी आणि शस्त्रक्रियेचे उपचार हाेतात. परंतु, रेडिएशन मात्र, खासगी रुग्णालयांतून घ्यावे लागते. तसेच ससूनमध्ये जे उपचार हाेतात ते इतर स्पेशालिटी असलेल्या डाॅक्टरांकडून करण्यात येतात. त्यासाठी स्वतंत्र विभाग वा डाॅक्टरही नाहीत. अनेक गुंतागुंतीच्या कर्कराेगासाठी सर्वसामान्यांना उपचारांसाठी एकतर खासगी रुग्णालयांमध्ये लाखाेंचा खर्च करावा लागताे किंवा पैसे नसल्यास मृत्यूला कवटाळण्याशिवाय दुसरा पर्याय नसताे.
मुंबईमध्ये कॅन्सरवर उपचार करण्यासाठी टाटा मेमाेरियल कर्कराेग रुग्णालय आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही सरकारी कॅन्सर रुग्णालय आहे. येथे रुग्णांवर माेफत तसेच सवलतीच्या दरांत उपचार हाेतात. परंतु, संपूर्ण राज्यातील रुग्णांचा भार या रुग्णालयांवर पडत असल्याने पुण्यासारख्या ठिकाणी ससूनच्या आवारात एक सरकारी कॅन्सर रुग्णालय उभे करण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी दिली हाेती. कारण, पुण्यात राज्यातून उपचारांसाठी रुग्ण येतात. त्यासाठी, ससून हाॅस्पिटलच्या समाेरील रस्ते विकास महामंडळाची जागा देण्याचे नियाेजन हाेते. त्या बदल्यात त्यांना येरवडा येथील मनाेरुग्णालयासाठी असलेली जागा देण्यात येणार हाेती. त्यासाठी सध्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व तत्कालीन ससूनचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी प्रयत्न केले हाेते. त्यांनी या जागेत साडेतीनशे काेटी रुपये खर्च करून स्वतंत्र कॅन्सर हाॅस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला हाेता. परंतु, अद्याप त्याबाबत शासनाने काेणताही निर्णय न घेतल्याने हाॅस्पिटल तर उभे राहिले नाहीच. शेवटी ती जागाही हातून गेल्याने सर्वसामान्यांनी जायचे काेठे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टाेपली
काही वर्षांपूर्वी पुण्याचे विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांनी ही जागा कॅन्सर हाॅस्पिटलला देण्याचे आदेश दिले होते. त्या संदर्भात ससून रुग्णालय प्रशासनाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ससून रुग्णालयासंदर्भात विविध प्रश्नांवर उत्तरे देताना रस्ते महामंडळाच्या मंगळवार पेठेतील जागेवर कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. परंतु दाेन्ही मंत्र्यांचे आश्वासनयुक्त बाेलणे म्हणजे ‘बाेलाचीच कढी आणि बाेलाचाच भात’ ठरला आहे.
शासकीय जागा ही बिल्डरच्या घशात घालणे हे निषेधार्ह आहे. कॅन्सरच्या खूप साऱ्या रुग्णांना उपचारांसाठी मुंबईला जावे लागते. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यावरील ट्रीटमेंटही न परवडणारी आहे. ती जागा रस्ते विकास महामंडळाने पुन्हा ताब्यात घ्यावी आणि तेथे शासकीय कॅन्सर हाॅस्पिटल उभे करायला हवे. - डाॅ. संजय दाभाडे, जन आराेग्य मंच