सांगवी : बारामती तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी, मोबाईलसह इतर वस्तूंची चोरी करणाऱ्या दोघांना बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. दोन आरोपींना अटक करून चौकशीदरम्यान २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
रोहन ऊर्फ कल्ल्या अविदास माने (वय २०, रा. सूर्यनगरी, ता. बारामती, जि. पुणे), ओंकार सुनील चंदनशिवे (वय २०, रा. तांदूळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रोहन ऊर्फ कल्ल्या माने याला मागील काळात देखील मोटरसायकलचोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. यामध्ये दोघांकडून ५ मोटारसायकल, ५ मोबाईल, २५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या असा एकूण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मागील काही दिवसांपासून बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरी उघड करणेचे आदेश दिले होते. सदरची कामगीरी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शशिकांत दळवी, होमगार्ड सिद्धार्थ टिंगरे, ओंकार जाधव यांनी केली आहे.
——————————————————————
फोटो ओळी : चोरट्यांना ताब्यात घेताना पोलीस निरीक्षक महेश ढवाण, योगेश लंगुटे व इतर.
२६०५२०२१-बारामती-०२
————————————————