पुणे: लघु व मध्यम कंपन्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीच्या सिनियर चीफ मॅनेजरने कंपनी बाहेरील व्यक्तीचे, व्यवसायाचे वीज बिल आणि जीएसटी भरून २ कोटी ७५ लाख ८४ हजार १५६ रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी महेश पुरुषोत्तम अगरवाल (४७, डी. पी. रोड, कोथरूड) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित एकनाथ बचुटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ मे २०२२ ते २० डिसेंबर २०२३ दरम्यानच्या काळात इलेक्ट्रोनिका फायनान्स कंपनीच्या एरंडवण्यातील ऑफिस मध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, इलेक्ट्रोनिका फायनान्स ही कंपनी लघु व मध्यम उद्योगांना मशीन विकत घेण्यासाठी कर्ज सहाय्य उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय करते. फिर्यादी महेश अगरवाल हे इलेक्ट्रोनिका फायनान्स कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्याच्य बरोबर त्यांच्याकडे कंपनीचे अकाउंट्स, ऑडिट टॅक्स या खात्याची देखील जबाबदारी आहे. तर आरोपी रोहित बचुटे हा सिनियर चीफ मॅनेजर आहे. बुचडेकडे कंपनीच्या सर्व शाखांचे जीएसटी भरण्याची जबाबदारी आहे. तर वीज बिल आणि स्टॅम्पिंगचा खर्च भरण्याची जबाबदारी हि इतर कर्मचाऱ्यांवर आहे. कंपनीचे फर्ग्युसन रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र येथे कॅश क्रेडिट खाते आहे. या खात्यातूनच जीएसटी, वीज बिल आणि स्टॅम्पिंगचा खर्च ऑनलाईन ट्रान्सझेक्शन ओटीपीचा वापर करून केला जातो. याविभागाचे बिल भरायचे असल्यास कंपनीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन ऑनलाईन ट्रान्सझेक्शन केले जाते. आरोपी बुचडे याने इलेक्ट्रोनिका फायनान्स कंपनीच्या बँक खात्यातून कंपनीच्या बाहेरील व्यक्तीचे आणि व्यवसायाचे वीज बिल आणि जीएसटी भरून कंपनीची २ कोटी ७५ लाख ८४ हजार १५६ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस करत आहेत.