पुणे: सुमारे ९० गुंठे जमीन खरेदी करून उर्वरित रक्कम न देता तब्बल २ कोटींची खंडणी मागणाऱ्याविरूद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानासाहेब शंकरराव गायकवाड, गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड, दीपक निवृत्ती गवारे (रा. बालगंधर्व चौक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ भगवान बालवडकर (वय २५, रा. बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे.
सौरभचे वडील भगवान बालवडकर यांची बालेवाडीत जमीन होती. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांचा विश्वास संपादन करून, ९० गुंठे जमीन प्रति गुंठा ३ लाख रुपये दराने खरेदी करण्याचा व्यवहार केला. मात्र, त्यापैकी १५ लाखांचा धनादेश देऊन आरोपींनी भगवान यांची २ कोटी ७२ लाख न देता फसवणूक केली. त्यामुळे सौरभ, त्यांचे वडील भगवान आणि पत्नी तिन्हीही आरोपींकडे पैसे मागण्यासाठी गेले. गायकवाड आणि गवारे यांनी बालवडकर कुटुंबीयांना वेळोवेळी रक्कम देण्याचे कबूल केले होते. मात्र, रक्कम न देता शिवीगाळ करून पिस्तुलातून गोळ्या घालण्याची धमकी दिली. तुम्हाला जमीन हवी असल्यास २ कोटी रुपये द्या, अशी खंडणी आरोपींनी मागितल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड तपास करीत आहेत.
---