शेलपिंपळगाव : खेड तालुक्यात अतिवृष्टी तसेच पूरहानीमुळे नुकसान झालेल्या रस्ते तसेच पूल दुरुस्ती कामासाठी आमदार दिलीप मोहिते-पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या प्रयत्नांतून सुमारे २ कोटी २४ लाख रुपये रकमेच्या निधीला पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
अतिवृष्टी व पूरहानीमुळे तालुक्यातील विविध रस्त्यांची तसेच पुलांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने स्थानिकांना दळणवळण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यांची तसेच पुलांची आवश्यक दुरुस्तीची कामे मार्गी लावण्याची मागणी खेड तालुक्यातील गावांमधून केली जात होती. नागरिकांची ही बाब लक्षात घेऊन आमदार दिलीप मोहिते पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी संबंधित कामांसाठी बांधकाम विभागाकडे निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला.
त्यानुसार दरावस्ती कनेरसर इजिमा ४९ (१५ लाख), प्रजिमा १९ ते आमराळवाडी ते रामा १२९ ला जोडणारा मार्ग (१० लाख), गाडकवाडी ते वरुडे रस्ता (१०लाख), वाफगाव ते मांदळवाडी रस्ता (१० लाख), कडूस ते मुसळेवाडी रस्ता (१०लाख), रामा १०३ जऊळके खुर्द ! रस्ता (१० लाख), कडधे - दरा ठाकर वस्तीकडे जाणारा रस्ता (१०लाख), आळंदी मरकळ रोड ते ठाकरवाडी ग्रामा १४९ (१०लाख), पिंपळगाव रामा ११६ मरकळ - कोयाळी रस्ता करणे (९४लाख), शिनोली - फदालेवाडी ते वरची सुपेवाडी रस्ता करणे (४५ लाख) अशा दहा गावांतील विकास कामासाठी २ कोटी २४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
अतिवृष्टी तसेच पूरहानीमुळे तालुक्यातील काही ठिकाणचे रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार तसेच विकासकामांना चालना देण्यासाठी बांधकाम विभागाकडून आवश्यक कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद पुणे.