पुणे : दुकानावर आयकर विभागाची रेड पडणार असल्याचे सांगून व्यवस्थापकाने एका एसीपीच्या मुलाच्या दुकानातून ५ किलो सोने, ५० किलो चांदी आणि रोख असा २ कोटी २७ लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर भागात घडली.
याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद रमेश कुलकर्णी (३५, रा. लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत ज्योतीरादित्य उर्फ यश राजेंद्र मोकाशी (२२, रा. निलगीरी लेन, बाणेर रोड, औंध) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मार्च २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी यांनी दोन वर्षांपूर्वी माळवाडी रोड हडपसर येथील शिवनेरी बिल्डिंग मध्ये वसुंधरा ज्वेलर्स नावाने सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरु केले होते. या दुकानाचे व्यवस्थापक म्हणून विनोद कुलकर्णी याची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी वसुंधरा ज्वेलर्स मध्ये ५ किलो सोने, ८५ किलो चांदी अशी भांडवली गुंतवणूक फिर्यादींनी नातेवाईक आणि मित्रांकडून घेऊन केली होती. हे सगळे सोने, चांदी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांना देऊन फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी हे एमएस चे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे निघून गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोकाशी डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यात आले. यानंतर मोकाशी यांनी वसुंधरा ज्वेलर्सचे कामकाज पाहायला सुरुवात केली. दुकाना संदर्भात व्यवस्थापक विनोद कुलकर्णी व इतर स्टाफ कडून माहिती घेत असताना मोकाशी यांच्या लक्षात आले की, दुकान सुरु करताना ५ किलो सोने व ८५ किलो चांदी घेतली होती. त्यापैकी पावणेतीन किलो सोने व ५० किलो चांदी कमी आहे. हे कमी असलेले सोने व चांदी दुकानात नव्हते. यानंतर मोकाशी यांनी ही बाब त्यांच्या वडिलांना सांगितली. फिर्यादी यांच्या वडिलांनी सोने, चांदी कमी असल्याबाबत व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याच्याकडे विचारणा केली त्याने ७ फेब्रुवारी रोजी सर्व सोने परत देतो आणि हिशोब पूर्ण देतो असे म्हणून निघून गेला.
यानंतर ८ फेब्रुवारी रोजी विनोद कुलकर्णीने याने सकाळी १० दुकानातील एका कामगाराला फोन करून सांगितले की, दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे व मालकाला हिशोब द्यायचा आहे. त्यासाठी सोने, चांदी तयार ठेव. यानंतर साडे दहा वाजता एक गाडी आली. कामगारांनी दुकानातील सोने, चांदी देऊन टाकली आणि विनोद कुलकर्णीने सांगितल्या प्रमाणे दुकान बंद केले. दुकानातील व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याच्याकडे सोपवण्यात आलेले ५ किलो सोने व ५० किलो चांदी आणि रोख रक्कम अशी २ कोटी २७ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करत आहेत.