ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 9 : नोटबंदीच्या काळात एजंटद्वारे घेतलेल्या स्वाइप मशिनद्वारे केलेल्या व्यवहारात अपहार करून चक्क मिलिटरी कॅन्टीनची दोन लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. साई कॅश या कंपनीचे प्रतिनिधी आनंद जगदीश वैष्णव (रा. मोरेश्वर सोसायटी, ठाणे),अनिल चंद्रकांत फुलेलु (रा. जुनी सांगवी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मिलिटरी कॅन्टीनचे शिपाई नीलेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. नोटबंदीमुळे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही स्वाईप मशिन साई कॅश कंपनीकडून अनिल फुलेलू यांच्यामार्फत घेतली होती. हे यंत्र खरेदी केल्यापासून स्वाईप मशिनद्वारे जेवढे आर्थिक व्यवहार व्हायचे, तेवढे पैसे अगोदर कंपनीच्या प्रतिनिधीच्या खात्यात जमा व्हायचे. कंपनीचा प्रतिनिधी आनंद वैष्णव याच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर तो मिलिटरी कॅन्टीनच्या बँक खात्यात ती रक्कम वर्ग करायचा. पहिले दोन महिने व्यवहार सुरळीत सुरू होते. जानेवारी २०१७ पासून मिलिटरी बँक खात्यावर रक्कम जमा होणे बंद झाले. विचारणा केल्यास तांत्रिक कारण देऊन वेळ मारून नेली जायची. अशा प्रकारे तब्बल २ लाख ८० हजार ३० रुपये जानेवारीनंतर मिलिटरी कॅन्टिनच्या खात्यावर जमा झालेच नाहीत. काही तरी गडबड आहे, ही बाब लक्षात आली. कंपनीच्या संबंधित प्रतिनिधींकडे विचारणा केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्या दोघांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.