बारामती (पुणे) :बारामतीच्या तत्कालीन डाक सहायकाने खातेदाराच्या जीवन विमा पाॅलिसीची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यावर वळवीत २ लाख ६२ हजार रुपये रकमेचा अपहार केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारामती टपाल कार्यालयाकडून अमृत अजिनाथ कुमटकर यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजीराव झाडे असे गुन्हा दाखल झालेल्या डाक सहायकाचे नाव आहे. झाडे सध्या शिरूर डाक कार्यालयात कार्यरत आहेत. ५ डिसेंबर २०२२ रोजी झाडे यांनी हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
बारामतीच्या मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये अशोक अरविंद काळभोर यांची जीवन विमा पाॅलिसी होती. या पाॅलिसीच्या परिपक्वता दाव्याची २ लाख ६१ हजार ९०० रुपयांची रक्कम काळभोर यांना मिळणार होती. परंतु झाडे यांनी ही रक्कम परस्पर आपल्या बचत खात्यात जमा केली. त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्याद्वारे स्वतःच्या इतर बँक खात्यात वळती करून घेतली. तसेच टपाल विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून, सरकारी पदाचा गैरवापर करून रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.