लोणी काळभोर : पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या कारची काच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरटयांपैकी एकाने सिमेंट ब्लॉकने फोडून तब्बल २ लाख ३५ हजार चोरल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच महत्वाची कागदपत्रे लंपास झाली आहेत. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली.
याप्रकरणी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पृथ्वीराज हिरामण काकडे ( वय ३३, रा. काकडे मळा, थेऊर, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काकडे यांनी दुपारी १ - १५ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथे मॅक्डोनल्डस् सिसिडी येथे मावस भाऊ निखील उंदरे यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपये उसने घेतले. सदरची रक्कम त्यांनी सँकमध्ये ठेवली. ते आपली कार घेऊन कुंजीरवाडी येथील ऑटो कॉर्नर पेट्रोल पंप येथे पोहोचले. तेथे डिझेलचे १ लाख ६० हजार रुपये चेक पेमेंट केले.
त्यानंतर कार पंपाच्या डाव्या बाजूस पार्क करुन ३ वाजण्याच्या सुमारास पंपासमोर असलेल्या ऑफिस मध्ये गेले. थोड्या वेळाने ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या लॉन्ड्रीवाल्याने त्यांना कोणीतरी तुमच्या कारची काच फोडल्याचे सांगितले. काकडे त्याच क्षणी कार जवळ गेले असता २ लाखांसहित कागदपत्रे चोरून नेल्याने त्यांचय निदर्शनास आले. असे फिर्यादीत नमूद केले आहे.