पुणे :पुणे शहरात गुरुवारी २ हजार २८४ नव्या कोरोनाबाधित (corona infection in pune city) रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली आहे. बुधवारी शहरात १ हजार ८०५ कोरोनाबाधित आढळून आले होते. शहरातील बाधितांची टक्केवारी अर्थाव पॉझिटिव्हिटी रेट १४.४७ (positivity rate in pune) टक्के इतका नोंदवला गेला आहे. आठ महिन्यांनी रुग्णसंख्येने २००० चा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ३० डिसेंबरपर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या २५०-३०० यादरम्यान आढळून येत होती. त्यानंतर ३१ डिसेंबरपासून अचानक रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला रुग्णसंख्येने ५०० चा टप्पा ओलांडला. आता २००० हून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. यापूर्वी १३ मे २०२१ रोजी २३९३ रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच तब्बल आठ महिन्यांनी पुन्हा रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागला आहे. वाढत्या कोरोनाबाधितांकडे धोक्याची घंटा म्हणून पाहिले जात आहे. शहरात कडक निर्बंध लागू होणार का, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शहरात गुरुवारी १५ हजार ७७५ चाचण्या झाल्या. त्यापैकी २२८४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर ८० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. १०६ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरु आहेत. २८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाबाधितांपैकी केवळ ७.८४ टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, इतर रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७६६५ झाली आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत शहरात ३९ लाख २२ हजार ९७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख १६ हजार ७७८ जणांचे कोरोनाचे निदान झाले. त्यापैकी ४ लाख ९९ हजार ९९१ जणांना पूर्ण बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. शहरात आतापर्यंत ९१२२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.