राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना टाळेबंदी व अनलॉकनंतरही अन्य वाहनांच्या खरेदीत मोठी घट झालेली असताना शेतीकामासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर खरेदीत मात्र वाढ झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अंतर्गत येणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर, अकलूज या शहरांमध्ये मात्र ट्रॅक्टर खरेदी वाढली आहे. कोरोना काळात शेती मात्र जोरात असल्याचे यावरून दिसते आहे.
एप्रिल २०२० ते २०२० या ८ महिन्यांच्या काळात पुणे विभागात ७ हजार ८५८ ट्रॅक्टर खरेदी केले गेले. याच काळात मागील वर्षी कोरोना वगैरे काहीही नव्हते. त्यावेळी ५ हजार ८४७ ट्रॅक्टरची खरेदी झाली होती. म्हणजे कोरोना काळात २ हजार ११ ट्रॅक्टर जास्तीचे खरेदी केले गेले. शेतीकामासाठी म्हणून ट्रॅक्टरची खरेदी होते. शेत नांगरणे, सपाटीकरण करणे, बांध घालणे अशी बरीच कामे ट्रॅक्टरच्या साह्याने केली जातात. कोरोनात सगळे बंद असतानाही शेतकऱ्यांनी या कामासाठी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य दिले असल्याचे एकूण आकडेवारीवरून दिसते आहे.
ग्रामीण भागात शेतीकामासाठी ट्रॅक्टर भाडेतत्वावर देण्याचा व्यवसायही केला जातो. तासावर पैसे आकारले जातात. त्यामुळे ही खरेदी झाली असावी असा शेती विभागातील अधिकाºयांचा अंदाज आहे. काहीजणांच्या मते शहरात नोकरीसाठी स्थायिक झालेले अनेकजण कोरोना काळात गावाकडे मुक्कामासाठी म्हणून गेले. तिथे आपल्या शेतीची अवस्था लक्षात घेऊन त्यांनीच शेतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला व शेती कसणाऱ्या भाऊबंद किंवा नातेवाईकांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्थसाह्य दिले. त्यातून ही संख्या वाढली असावी.
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकºयांसाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणाऱ्या काही योजना आहेत. त्यातून १ ते सव्वा लाख रूपयांपर्यंतची थेट आर्थिक मदत केली जाते. कोरोना काळात अन्य सरकारी खात्यांचे कामकाज बंद असले तरी शेती विभागातील कामकाज मात्र सुरू होते. त्यामुळे या योजनेत अर्ज करणाºयांची संख्या वाढली असेही अधिकाऱ्यांचे मत आहे. या एप्रिल ते नोव्हेंबर २०२० काळात मोटार सायकल वगळता मोटार कार, कॅब, स्कूल बस अशा वाहनांच्या खरेदीमध्ये मात्र निम्म्याने घट झालेली आहे.
सर्वाधिक म्हणजे २५२२ ट्रॅक्टर सोलापूरमध्ये खरेदी झाले. मागील वर्षी सोलापूरमध्येच ही संख्या १२३१ होती. बारामतीमध्ये कोरोना काळात १५०६ तर याच काळात मागील वर्षी १०७७ ट्रॅक्टर खरेदी झाले होते. पुणे जिल्ह्यात मागील वर्षी ८६१ तर यावर्षी १२०२ व पिंपरी चिंचवडमध्ये यावर्षी १०३३ व मागील वर्षी ११६५ ट्रॅक्टर खरेदी झाले होते. अकलूजमध्ये यावर्षी १६०६ तर मागील वर्षी १२३१ ट्रॅक्टरची खरेदी झाली होती.
कोरोना काळात व यापुढेही शेतीक्षेत्रालाच वाव आहे हे लक्षात आल्यामुळे ज्यांची शेती आहे त्यांनी ती सुधारण्याचा, आधुनिक तंत्राने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असणार. एकूण शेतकरी संख्येच्या तुलनेत वाढलेली ट्रॅक्टर खरेदी कमीच आहे, पण येत्या काळात त्यात आणखी वाढ झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. जिल्ह्यातही ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्थसाह्य करणाºया करणाºया योजनांमध्ये अर्जदारांची संख्या वाढत आहे.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक