पुणे : पाणी परवान्यातील तक्रारदाराच्या सासरे व साडुचे नाव कमी करुन मुलींची नावे लावण्यासाठी केलेला अर्ज पुढे पाठविण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे खात्यातील वडगाव निंबाळकर येथील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. सिकंदर शहाबुद्दीन शेख (वय ५३, कनिष्ठ लिपिक, वडगाव पाटबंधारे शाखा) असे त्याचे नाव आहे़.
याबाबत ६३ वर्षांच्या ज्येष्ठ शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़. त्यांनी पणदरे उपविभागात पाणी परवान्यातील त्यांचे सासरे व साडु यांची नावे कमी करुन त्यांच्या जागेवर मुलीची नावे लावण्यासाठी अर्ज केला होता़. हा अर्ज पुढे पाठविण्यासाठी सिकंदर शेख यांनी त्यांच्याकडे २ हजार रुपयांची लाच मागितली़. त्यांनी बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़. त्यानंतर त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी पाटबंधारे विभागाच्या वडगाव निंबाळकर शाखेच्या कार्यालयात सापळा रचला़. तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच घेताना शेख यांना पकडण्यात आले़.