कोरेगाव भीमा : कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील आय टी डब्लू कंपनी समोरील वाहनतळ लगत असलेली १५ फूट उंचीची भित कोसळून भिंती शेजारी उभे असलेल्या एका कामगारांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक मिळाली असून चारचाकी व दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कोरेगाव भीमा येथील आय टी डब्लू कंपनीजवळ कामासाठी आलेले कामगार वाहनतळाजवळ उभे होते. त्यांच्या मागे असलेली भिंत सकाळी८ वाजून ३४ मिनिटांनी पडल्यानंतर त्याखाली पाच कामगार दबले गेले. यामध्ये एका कामगारांचा मृत्यू झाला तर एक जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत आठ दुचाकी गाड्या तर दोन सायकली व दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. या अपघातात राजीव कुमार व मंजित कुमार यांचा मृत्यू झाला तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत.
आमदार अशोक पवार यांना सदर अपघाता बाबत माहिती मिळाली असता त्यांनी तातडीने भेट देत पाहणी केली. तसेच ज्यांची जागा आहे त्या सबंधिंतावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जखमींवर तातडीने उपचार करण्यात येऊन त्याचा खर्च जे कागदोपत्री मालक असतील त्यांच्या कडून घ्यावा तसेच पुढील धोकादायक भिंत तातडीने पाडण्याबाबत सूचना पोलीस वरिष्ठांशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधत दिल्या. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पि.के. (अण्णा) गव्हाणे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सागर गव्हाणे, सूर्यकांत गव्हाणे व स्थानिक उपस्थित होते. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार आत्माराम तलोळे, पोलीस अंमलदार प्रतीक जगताप यांनी तत्काळ भेट देत घटना स्थळाची पाहणी करत पंचनामा केला.