तळेघर : न्हावेड (ता. आंबेगाव) येथील दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सखुबाई शंकर घोडे (वय १७ वर्षे ) या मुलीचा मृतदेह शोधण्यात घोडेगाव पोलिसांना यश आले असल्याची माहिती घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
घोडेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत मागील सहा महिन्यांपासून बारा अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल होत्या. घोडेगाव पोलिसांनी या बेपत्ता मुलीचा शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. बऱ्याच मुली या पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केल्यानंतर मिळून आल्या होत्या. मात्र, मिसिंग झालेल्या मुली मिळून आल्याचे पालकांनी पोलीस स्टेशनला कळविले नव्हते. अशा प्रकारे गेल्या सहा महिन्यामध्ये सात पुरुष, चौदा महिला, एक मुलगा व बारा अल्पवयीन मुली यांना शोधण्यात घोडेगाव पोलिसांना यश आले आहे. परंतु त्यामध्ये ही मुलगी निष्पन्न होत नव्हती.
४ फेब्रुवारी २०२० रोजी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सदर गुन्ह्यामधील अपहृत मुलगी सखुबाई हिने आत्महत्या केली असून तिचा सांगाडा तिच्या वडिलांना तिच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी मिळाला होता. परंतु मुलीचे वडील शंकर मालू घोडे यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. मिळालेल्या या माहितीच्या आधारे घोडेगाव पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावून त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुलीचा सांगाडा घोड नदीलगत डोंगरदऱ्यामध्ये असणाऱ्या जंगलामध्ये पुरला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. तहसीलदार रमा जोशी यांच्या उपस्थितीत डाॅ. कांबळे, डाॅ. चंद्रकांत चपटे, डाॅ. हांडे यांनी पंचनामा करुन मृतदेह बाहेर काढला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, सहाय्यक फौजदार जिजाराम वाजे, संदीप लांडे, पोलीस नाईक जालिंदर राहणे, पोलीस नाईक, संदीप रसाळ पोलीस शिपाई, धोंडू मुठे होमगार्ड स्वप्नील कानडे, दीपक पारधी तपास करत आहेत.