पुणे: एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
दरम्यान ड्रग्स पार्टी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर त्या हॉटेलच्या मॅनेजरसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.
आता पुण्यातील L3 बार मध्ये कथित ड्रग्सचे सेवन करणाऱ्या २ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाला पुणे पोलिसांनी तर दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत. दोघे ही तरुण २४-२५ वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे दोन्ही तरुण एकमेकांचे मित्र असून रात्री १.३० वाजता या तरुणांनी L3 बार मध्ये एंट्री केली होती.