मंचर: आंबेगाव तालुक्यात दीड महिन्यानंतर प्रथमच २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. दरम्यान, लोकांकडून नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. एवढेच नाही तर साधा मास्क सुद्धा लावण्याची काही नागरिक तसदी घेत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंबेगाव तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात कोरोनाने कहर केला होता. दररोज दोन ते चार असे रुग्ण सापडत होते. अक्षरश: रुग्णालयात जागा अपुरी पडू लागली होती. ऑक्टोबर महिन्यात रुग्ण वाढीचा आलेख कमी होऊ लागला. नोव्हेंबर महिन्यात संख्या झपाट्याने कमी झाली. दीवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढत्या थंडीमुळे दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, डिसेंबर उजाडला तरी कोरोना नियंत्रणात होता. ऑक्टोबर महिन्यापासून दररोज एक आकडी असणारी रुग्ण संख्या अचानक दोन आकडी झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
बुधवारी आलेल्या अहवालात दोन दिवसात रुग्णांची संख्या वीस आली आहे. विशेष म्हणजे मंचर शहरात काहीसा अपवाद वगळला तर दररोज एक दोन रुग्ण सापडत आहे. आज आखेर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या चार हजार २७६ झाली आहे. त्यापैकी १११ रुग्णांचा मृत्यू झाला असून १५९ रुग्ण उपचार घेत आहेत. आंबेगाव तालुक्यात मे महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६ होती. जून महिन्यात २५ रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात २२७ रुग्ण आढळले होते. ऑगस्ट महिन्यात ८६५, सप्टेंबर महिन्यात दोन हजार १२०, ऑक्टोबर महिन्यात ७३९ रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ११० रुग्ण आढळले आहेत. ९ डिसेंबर अखेर साठ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचे संकट टळले असे समजून काही नागरिक हलगर्जीपणे वावरताना दिसत आहे. तोंडाला मास्क न बांधणे,गर्दी करणे, फिजिकल डिस्टन्सींग न पाळणे असे प्रकार घडत आहे. बाजारात होणारी प्रचंड गर्दी पाहता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंबेगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. नागरिकांनी स्वत:ची काळी घेत मास्क बांधणे, फिजिकल डिस्टन्सींग यांसारखे नियम पाळणे आवशक्य आहे. अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
जालिंदर पठारे, गटविकास अधिकारी.