जागतिक जल दिन
पुणे : वृक्षप्रेमी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य काम केले तर कोट्यवधी लिटर पाणी संकलित होऊ शकते. त्याचे उदाहरण पाटस येथील वन विभागाच्या जागेतील मस्तानी तलाव आहे. सध्या या ठिकाणी २० कोटी लिटरहून अधिक पाण्याचा साठा झाला असून, २०१९ मध्ये या तलावाचे खोलीकरण केले होते. तसेच या पाण्यामुळे तेथील वन्यजीवांची तहान भागत आहे. असाच उपक्रम प्रत्येक गावालगत झाला तर सर्व टंचाईमुक्त होऊ शकतात.
पाटस येथे एक मस्तानी तलाव आहे. हडपसर येथील दिवे घाटात जसा तलाव आहे, अगदी तसाच हा आहे. या तलावाच्या परिसरात सुमारे १४१२ एकर क्षेत्र आहे. २०१९ साली या तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रस्ताव वृक्षप्रेमी राजेश लाड यांनी वन विभागाकडे दिला होता. तेव्हा तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार स्वाती नरूटे, तलाठी शंकर दिवेकर व पाटस ग्रामपंचायत यांनी त्यास परवानगी दिली. या कामासाठी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक विवेक खांडेकर यांनी देखील पाहणी करून कामाला परवानगी दिली हाेती. खोलीकरणासाठी संतोष भागवत, योगेश काळे, सचिन भागवत, पांडुरंग जगताप व राजेशलाड यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे २०२० मध्ये झालेल्या पावसात हा तलाव पूर्णपणे भरला. आता या ठिकाणी २० कोटी लिटरहून अधिक पाणी साठले आहे. त्याचा उपयोग तेथील वन्यजीव करत आहेत. पक्ष्यांची संख्याही तिथे वाढली आहे.
पाणीसाठा मोठा झाल्याने परिसरात वृक्षलागवड करण्याचा प्रस्ताव लाड यांनी वन विभागाला दिला. पण त्यानंतर काहीच काम झाले नाही. त्यानंतर आताचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना लाड यांनी भेटून सर्व माहिती दिली. त्यांनी लगेच या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे लाड म्हणाले. मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी तेथील वन क्षेत्रात जैवविविधता उद्यान करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परंतु, स्थानिक वन विभागाचे अधिकारी मात्र काहीच हालचाली करत नसल्याची खंत लाड यांनी व्यक्त केली.
—————————————
या पाणीसाठ्यामुळे पाटस गावातील अनेक विहिरींची पाणी पातळीदेखील वाढली आहे. तलावाची रुंदी २३४ मीटर, लांबी २१३ मीटर आणि खोली १० मीटर आहे. या लाखमोलाच्या जलसंपत्तीचा उपयोग वृक्षारोपण, वन्यजीव आणि नागरिकांना होत आहे.
- राजेश पांडुरंग लाड, वृक्षप्रेमी, पाटस
————————————