भूजल पातळीकडे दुर्लक्ष : तपासणीची नाही यंत्रणाच
पुणे : शहरात पाण्याचा सुकाळ आहे, मात्र बेहिशोबी वापर होत राहिला तर उपनगरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ निर्माण होईल. भूजल पातळीची तपासणी करणारी यंत्रणाच महापालिकेकडे नाही त्यामुळे उपायांकडेही पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
नियोजनाच्या अभावाने मध्यभागात मुबलक पाणी आणि उपनगरे पेलाभर पाण्यालाही महाग अशी स्थिती झाली आहे. त्यावर त्वरित उपाय राबवण्याची गरज आहे, पण महापालिकेकडे त्यासाठीची स्वतंत्र यंत्रणाच नाही. राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे राज्य कार्यालय पुण्यात आहे. पण त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील भूजल तपासणीचे अधिकार नाहीत.
तरीही सन २००७ मध्ये त्यांनी शहराच्या भूजल स्तराचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष ‘पुण्यात भरपूर पाणी, पण त्याचा अयोग्य वापर भरपूर’ अशाच आशयाचे आहेत. त्यावेळी त्यांनी शहरातील ३०९ विहिरींची तपासणी केली आणि ४ हजार बोअर तपासले. त्यानुसार पुण्याची भूजल पातळी जमिनीपासून १३ ते २० फुटांवर असल्याचे निरीक्षण नोंदवले.
पुण्यात नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. नोंदणीकृत म्हणजे अधिकृत नळजोड साडेचार लाख आहेत. अनधिकृत नळजोड ३ लाख असतील असा अंदाज आहे. मध्यभागात फारसे बोअर नाहीत. उपनगरात ते मोठ्या संख्येने आहेत, पण त्याची महापालिकेकडे नोंदच नाही. सन २००७ च्या अभ्यासच अजून अधिकृत समजला जातो. त्यानंतर भूजल यंत्रणेला ना सरकारने शहरांची भूजल पातळी पाहायला सांगितले ना महापालिकेने!
चौकट
“पुण्याचा आकार बशीसारखा आहे. त्यामुळे मध्यभागात पाण्याचा कधीही तुटवडा होणार नाही. उपनगरांमध्ये मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. बोअर वाढल्यास ते आणखी वाढेल. जलसंवर्धन, जलपुनर्भरण अशा उपायांची गरज आहे.”
-भूजल तज्ज्ञ, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा
चौकट
“महापालिकेकडे भूजल तपासणीची यंत्रणा नाही. बोअर घेताना पालिकेची परवानगी, ना हरकत असे काहीही नसते. त्यामुळे नोंद नाही. रोज १४०० दशलक्ष लिटर पाणी शहराला लागते. समान पाणी पुरवठा योजनेतून पाण्याचे योग्य व्यवस्थापन होईल.”
अनिरूद्ध पावसकर- प्रमुख अभियंता, पाणीपुरवठा, महापालिका