पुणे : तुम्ही पाठवलेले पार्सल कस्टम डिपार्टमेंटमध्ये अडकले आहे. त्यामध्ये ड्रग्स असल्याने ते पुढे जाऊ शकत नाही अशी भीती दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.२८) कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका ५९ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन कुरियर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ५०० ग्राम ड्रग्स आहेत म्हणून तुमचे पार्सल मुंबई येथील कस्टम डिपार्टमेंटमध्ये अडकले आहे असे सांगितले. भारताबाहेर ड्रग्स पाठवण्यासाठी महिलेच्या आधार कार्डचा वापर होत असल्याने एनसीबीकडे तक्रार दाखल झाली आहे अशी भीती दाखवून स्काईप एप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस मिळवून खासगी माहितीचा वापर करत महिलेच्या बँक खात्यातून २० लाख ८१ हजार ६३४ रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
महिलेने एफडी मोडून पैसे भरले-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या खात्यातील पैसे स्कॅनिंग करावे लागेल. त्यासाठी तुमचे एफडी, म्युच्युअल फंड मध्ये असलेले सगळे पैसे अमुक अमुक अकाउंटला पाठवा. सायबर चोरट्याच्या सांगण्यावरून महिलेने एफडी मोडून सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवले.
अशी घ्या काळजी- तुम्ही पार्सल पाठवलेले नसल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही.- असा फोन आल्यास सर्वात आधी सायबर पोलिसांना कळवणे गरजेचे आहे.- कोणतेही एप्लिकेशन डाऊनलोड करू नये.- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
फसवणूक झाल्यास तक्रार कुठे कराल?सायबर फ्रॉड अडीच लाखांच्या आतील असेल तर हद्दीतील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवता येते. जर सायबर फसवणुकीमध्ये गेलेली रक्कम अडीच लाखांपुढील असेल तर शिवाजी नगर येथे असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते. ७०५८७१९३७१/ ७०५८७१९३७५ या मोबाईल क्रमांकावर फोन करूनही तक्रार नोंदवता येते. तसेच crimecyber.pune@nic.in या पत्त्यावर ई-मेल द्वारे तक्रार नोंदवता येते.