पुणे : गेल्या 10 वर्षांपासून पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन दिवाळी निमित्त भरविण्यात येते. यंदा 30 अाॅक्टाेबर राेजी उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनात केवळ एका अाठवड्यात विक्रमी अशी 20 लाख 57 हजार 906 रुपयांची विक्री झाली अाहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून अायुष्यात अंधकार असलेल्या कैद्यांच्या जीवनात एक अाशेचा किरण यानिमित्ताने अाला अाहे.
येरवडा कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांकडून कारागृहात विविध कामे करुन घेतली जातात. कपड्यांपासून ते खाण्याच्या वस्तूंपर्यंत अनेक वस्तू हे कैदी तयार करत असतात. खास दिवाळी निमित्त अाकर्षक अाकाशकंदील तसेच पणत्या इतर शाेभेच्या वस्तू कैदी तयार करत असतात. गेल्या 10 वर्षांपासून येरवडा येथील कारागृहाच्या शाेरुममध्ये या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते. वर्षानुवर्षे या प्रदर्शनाला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद वाढत चालला अाहे. यंदा 30 अाॅक्टाेबर राेजी या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी अभिनेते नागेश भाेसले, अभिनेत्री साेनाली कुलकर्णी, कारागृह मुख्यालयाचे विशेष पाेलीस महानिरीक्षक डाॅ. विठ्ठल जाधव, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृहाचे अधिक्षक यु.टी. पवार अादी उपस्थित हाेते.
यंदा दिवाळीत सुरु करण्यात अालेल्या या प्रदर्शनात अवघ्या एका अाठवड्यात प्रदर्शनातील वस्तूंची तब्बल 20 लाख 57 हजार 906 रुपयांची विक्रमी विक्री झाली अाहे. हे उत्पन्न गेल्या वर्षी 15 लाख इतके हाेते. यंदा त्यात जवळजवळ साडेपाच लाखांची वाढ झाली अाहे. यंदा या प्रदर्शनात सर्वाधिक लाकडी फर्निचर, हॅन्डलूमची कापडी उत्पादने व पर्यावरणपूरक अाकाशकंदील यांची माेठ्याप्रमाणावर विक्री झाली अाहे. कारागृहातील कैदी शिक्षा भाेगून बाहेर पडल्यानंतर त्यांना एक उत्पादनाचे साधन निर्माण व्हावे, तसेच त्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करता यावा या हेतूने कारागृहात कैद्यांना विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा माेबादलाही त्यांना दिला जाताे. कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते.