लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्यास इस्टेट एजंटला तुमची ५० लाखांची सुपारी मिळाली असल्याचे सांगून २० लाख रुपये घेण्यास आणलेल्यास खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले.
सागर दत्तात्रय फडतरे (वय २९) आणि त्याचा मित्र गणेश दत्तात्रय फडतरे (वय २९, दोघे रा. बोपगाव, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोंढवा परिसरात जमिनीच्या खरेदी विक्री एजंटाना मोबाईल फोनद्वारे तुमची ५० लाख रुपयांची सुपारी मिळाली असून जीव वाचवायाचा असेल तर त्यासाठी २० लाख रुपये द्या अशी वारंवार मागणी केली. या एजंटने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार कोंढवा येथील रियल इस्टेटच्या कार्यालयात २० लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या सागर फडतरे याला पोलिसांनी पकडले. त्याच्याबरोबरच खंडणीसाठी फोन करणारा त्याचा मित्र गणेश फडतरे याला अटक करण्यात आली आहे.
सागर फडतरे हा १२ वीपर्यंत शिकला असून एका ठिकाणी नोकरी करतो तर, गणेश हा एमएस्सी झाला असून सध्या वेगवेगळ्या परिक्षा देत आहे. दोघांच्या नात्यातील फिर्यादी असून त्यांच्याकडे पैसे असल्याची दोघांना माहिती होती व ते पोलिसांकडे जाणार नाही, असे वाटल्याने त्यांनी धमकावून पैसे लाटण्याचा कट रचला होता. पण तो त्यांच्या अंगाशी आला.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे व प्रविण पडवळ यांनी केली.