पुणे: एकाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, दुसरा विमान कंपनीत कामाला (ग्राऊंड स्टाफ) होता. तर तिस-याने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असे तिघे उच्चशिक्षित तरुण सिंहगड रस्ता परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आले. आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या सापळ्यात अडकले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर,घाटकोपर, मुंबई), पियूष शरद इंगळे (वय २२, रा. स्पाईन रोड, चिखली,पिंपरी- चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सिंहगड रस्ता परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी नऱ्हे परिसरातील भुमकर चौकात तिघे जण अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप शिर्के यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मिश्रा, व्यास आणि इंगळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलीग्रॅम एल.एस.डी. असे अमली पदार्थ आढळून आले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, सचिन माळवे, विनायक साळवे, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, सुजीत वाडेकर, नुतन वारे, रेहाना शेख, विपुल गायकवाड यांनी ही कारवाई केली.