कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ग्रामीण भागाची पाहणी केली असता, ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या ठिकाणची रुग्णसंख्या वाढत आहेत अशी गावे हाय अॅलर्ट व ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या ठिकाणची रुग्णसंख्या कमी होत नाही, ती अलर्ट गावे म्हणून घोषित करणे क्रमप्राप्त ठरले. त्यानुषंगाने संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात रुग्णसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवेली तालुक्यातील हाय अॅलर्ट व अॅलर्ट गावे पुढीलप्रमाणे - हाय अॅलर्ट गावे - लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, पेरणे, लोणी कंद, केसनंद, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, गाऊडदरा, वडगाव शिंदे, किरकटवाडी, व देहू नगर पंचायत.
अलर्ट गावे - उरुळी कांचन, खडकवासला, डोणजे, कोंढवे धावडे, रहाटवडे, शिंदवणे व मांगडेवाडी.
वरील २७ गावांत सर्व ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय अधिकारी यांनी भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे. गावस्तरीय समित्या कार्यन्वित कराव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे. याचबरोबर पोलीस प्रशासनाने वरील ग्रामपंचायत क्षेत्रात पाळत वाढवावी. जेणेकरून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. तर आरोग्य विभागाने या सर्व गावांमध्ये लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल याप्रमाणे नियोजन करावे. जेणेकरून कोविडचा संसर्ग आटोक्यात आणणे शक्य होईल, असे आदेश देण्यात आले आहेत.
याचबरोबर या गावातील गावांतील अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, आरोग्यविषयक कामकाज असेल तरच शक्यतो बाहेर पडावे. कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात कुटुंबासमवेत असतानाही मास्कचा वापर करावा. याचबरोबर सहव्याधी असणारे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.