२० वर्ष त्यांनी कागदावर दाखवलं, आम्ही चार वर्षांत प्रत्यक्षात आणलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 05:56 PM2018-11-16T17:56:39+5:302018-11-16T18:00:17+5:30
रिंग रोड, मेट्रो असा कोणताही प्रकल्प नवीन नव्हता. परंतु, मागील सत्ताधाऱ्यांनी ते केवळ कागदावर ठेवले.
पुणे : पुण्याचा विकास करू म्हणून त्यांनी २० वर्ष कागदावर प्रकल्प दाखवले मात्र, भाजपने अवघ्या साडेचार वर्षांत ते प्रत्यक्षात आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता टीका केली. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, विजय काळे, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, पंधरा वर्ष प्रलंबित असलेला पुण्याचा वाहतूक प्रश्न भाजपने मेट्रो आणून सोडवला.रिंग रोड, मेट्रो असा कोणताही प्रकल्प नवीन नव्हता. परंतु, मागील सत्ताधाऱ्यांनी ते केवळ कागदावर ठेवले.चोवीस तास पाणी योजनेतवर त्यांनी फक्त चर्चा केली. स्मार्ट सिटीचा पैसाही त्यांना योग्य वापरायचा नव्हता.गरीबापासून मध्यमवर्गीयांपर्यंत आणि श्रीमंतापासून ते फकिरापर्यंत सर्वांच्या स्वप्नातलं शहर म्हणून पुण्याला विकसित करण्याचं भाजपचं स्वप्न आहे.
शिरोळे म्हणाले की, माझा हा कार्य अहवाल मी श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करतो.खासदार कामातून दिसला पाहिजे असा माझा प्रयत्न होता.याच प्रयत्नातून स्मार्ट सिटी, मेट्रो, पीएमआरडीए असे प्रकल्प मी शहरात आणले.