राजगुरुनगर: राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधारकार्ड गरजेचं आहे. मात्र खरपुडी येथे एका ओढ्यात जवळपास २००ते २५० आधारकार्ड सापडले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पोस्ट ऑफिसच्या प्रशासकीय यंत्रणांमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं ओळखपत्र आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकतात. मात्र, खरपुडी खंडोबा गावाकडे जाणाऱ्या काळे वस्ती (ता. खेड ) येथील वनविभागाच्या नर्सरी समोरील ओढ्यात २००ते २५० आधारकार्ड सापडली आहेत. तसेच सरकारी पोस्टाने एलआयसीच्या नोटिसा, कागदपत्रे, नोटिसा एका गोणीत अज्ञात व्यक्तीने भरून ओढयात टाकल्या होत्या. गोण्यात भरलेली सगळी कागदपत्रे कित्येक दिवस या ओढयात पडून होती. तसेच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्याने काही आधार कार्ड व इतर कागदपत्रे भिजल्याने खराब झाली आहे. सापडलेली आधार कार्ड वाकी, संतोष नगर येथील असल्याचे खरपुडीचे माजी सरपंच मोतीराम काळे, प्रशांत गाडे यांनी सांगितले. या आधारकार्डाची छपाई ६ वर्षांपूर्वी करण्यात आली असल्याचे दिसुन येत आहे. मात्र पोस्टातील कर्मचानी संबंधित ठिकाणी वितरण न केल्याने ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी ही आधारकार्ड पिशवीत भरून ओढ्यात फेकल्याची शक्यता आहे. यांची कुणकुण पोस्टमनला लागताच आज (दि३० ) रोजी सकाळी ही आधार कार्ड, व इतर नोटिसा पोस्टमन ओढयातुन गोळा करुन घेऊन गेला असल्याचे समजते. याबाबत ही आधार कार्ड का टाकण्यात आली, ती बनावट आहे का? यांसारख्या एक ना अनेक शंका परिसरात उपस्थित केल्या जात आहे. ...........................................................माझी सहा महिन्यापुर्वी या ठिकाणी बदली झाली आहे. तसेच लॉक डाऊन व पुणे येथे कन्टेंमेन्ट झोनमध्ये मी राहत असल्यामुळे मला या विषयांची माहिती नाही. मी चौकशी करून, माहिती घेऊन दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गणेश वरुडकर. सब डिव्हीजन ऑफिसर , खेड चाकण )