पुणे - Pune Police Commissioner took out the gangster's parade ( Marathi News ) पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात चार्ज घेताच कुख्यात गुंडांना चांगलाच दणका दिला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी आज २००-३०० कुख्यात गुंडांची ओळख परेड घेतली. त्यावेळी गजा मारणेसह सर्व गुंड रांगेत उभे होते. याठिकाणी अमितेश कुमार यांनी प्रत्येक टोळीला समज देत सक्त ताकीद दिली. यापुढे इन्स्टाग्रामवर रिल्स टाकली आणि भाईगिरी दाखवली तर सोडणार नाही. आतापर्यंत जे काही गुन्हे नोंद असतील मात्र यापुढे अशी कृत्य केल्यास सोडणार नाही असं अमितेश कुमार यांनी बजावलं.
पुणे पोलीस आयुक्तालयात दोन रांगेत गुंड उभे केले होते. त्यात एका बाजूला कुख्यात गुंड निलेश घायावळ, गजा मारणे यासह अनेक टोळ्या होत्या तर दुसऱ्या बाजूला काही तरूण जे नुकतेच गुन्हेगारी क्षेत्रात आलेत त्यांना उभे केले होते. अमितेश कुमार यांनी सगळ्या टोळीला सक्त ताकीद दिली. याठिकाणी पोलीस आयुक्तांनी म्हटलं की, यापुढे कुठलाही गुन्हा करायचा नाही. कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप यावर स्टेटस ठेऊन दादागिरी दाखवायची नाही असं कडक शब्दात सुनावले.
गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी आम्ही प्लॅनिंग करत आहोत. त्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कॉल करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला. गुन्हेगारी कृत्य करू नये यासाठी खबरदारी म्हणून त्यांच्याकडून कायदेशीर बाजू करून घेतल्या आहेत. २६७ रेकॉर्डवरचे गुन्हेगार याठिकाणी बोलावले होते. हा आमचा पूर्वीचा प्लॅन ठरला होता. त्यानुसार त्यांना सूचना दिल्या आहेत. रिल्समार्फत आपण गेल्यावर्षी २४ गुन्हे दाखल केलेत असं पुणे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली. सध्या गुन्हेगारीची उद्दातीकरण करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. त्यातून नवे गुन्हेगार तयार होतात या प्रकाराला आळा बसावा यासाठी पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली.
दरम्यान, येथे जमलेल्या सर्व गुन्हेगारांकडून हमीपत्र भरून घेतले त्यात यापुढच्या काळात कुठल्याही गुन्ह्यात मी सहभागी होणार नाही आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी होणार नाही असं लिहून घेण्यात आले. पुण्यातील धनकवडी, कोथरुड, कात्रज यासारख्या अनेक भागातील विविध टोळ्या याठिकाणी आल्या होत्या. पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे या गुंडाच्या ओळख परेडमध्ये नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेला गुंड निलेश घायावळ, पार्थ पवार यांनी ज्याच्या घरी भेट दिली असा गजा मारणे या कुख्यात गुंडाचाही सहभाग होता.