लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अवयवदानाच्या चळवळीला बळ देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत शासनातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे क्यूआर कोड उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन केल्यावर थेट संकेतस्थळावर जाऊन सोप्या पद्धतीने अर्ज करणे शक्य झाले आहे. प्रक्रिया सोपी असल्याने जून ते आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत २०० हून अधिक जणांनी अर्ज केले आहेत. ‘नॅशनल आॅर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन’ अर्थात ‘नोटो’ आणि ‘रिजनल आॅर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन’ अर्थात ‘रोटो’ तर्फेही ही सुविधा उपलब्ध केली आहे.
अनेकांना अवयवदान करण्याची इच्छा असते. मात्र, त्यासाठी भरावा लागणारा अर्ज, प्रक्रिया लांबलचक असल्याच्या समजातून किंवा केवळ योग्य माहिती न मिळाल्याने अनेक जण पुढाकार घेत नाहीत. ही प्रक्रिया सोपी व्हावी आणि अवयवदान करणा-यांची संख्या वाढून रुग्णांना संजीवनी मिळावी, यासाठी सोशल मीडियाचा विधायक पद्धतीने उपयोग होत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी चळवळीला बळ देण्यासाठी आपणहून पुढाकार घेतला आहे, अशी माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पुणे विभागात जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान ४३ अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. एकूण २० मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. यामध्ये २० मूत्रपिंड, १९ यकृत, १ हृदय, २ स्मॉल बॉवेल आणि १ किडनी, स्वादूपिंड या अवयवांचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया संथ झाली होती. ब्रेन डेड व्यक्तींच्या अवयवांचे प्रत्यारोपण कसे करायचे, याबाबत कोरोना काळात इंडियन सोसायटी आॅफ नेफ्रॉलॉजी आणि इंडियन सोसायटी आॅफ आॅर्गन ट्रान्सप्लांट यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली होती. मे महिन्यात दुसरी लाट ओसरल्यावर अवयवदानाच्या प्रक्रियेला पुन्हा गती आली आहे.
------------------------
मृत्यूपश्चात अवयवदान अर्थात कॅडेव्हर डोनेशनविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी व अशा अवयवदानाच्या मार्गातील आव्हाने दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांचा आराखडा तयार करण्यासाठी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिसिन अँड लॉतर्फे श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात आली आहे. नातेवाईकांचे समुपदेशन, पर्यायी तपासण्या, अवयवाच्या प्रतीक्षेत असलेले केअरगिव्हर्स आणि रुग्ण यांच्यासमोरील आव्हानांपासून ते अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये आणि राज्य आणि केंद्रीय पातळीवरील अवयव प्रत्यारोपणाच्या कामामध्ये शिस्तबद्धता आणण्याच्या आवश्यकतेपर्यंत अनेक आव्हानात्मक मुद्द्यांचा यामध्ये परामर्श घेण्यात आला आहे.