पुणे - माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या टेलरबॉम्बने देशभरात खळबळ उडवून दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी सचिन वाझेसह इतर काही जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता, पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संबंधी असलेल्या लेटर बॉम्बने खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे हे पत्रही एका पोलीस कर्मचाऱ्यानेच लिहिल्याचं पत्रावरुन दिसून येत आहे. मात्र, हे पत्र बनावट असल्याचं संबंधित कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.
आयपीएस कृष्णप्रकाश यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर, ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याचेही दिसून आले. मात्र, आता त्यांच्या नावे मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या या पत्रामुळे राज्यातील पोलीस दलात पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. यात चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा समावेश आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं पत्रावरील मजुरातून स्पष्ट होत आहे. कारण, डोंगरे यांचं अर्जदार म्हणून या पत्रावर नाव आहे. मात्र, हे पत्र आपण लिहिलं नाही, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. एका वेब पोर्टलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काय म्हटलंय पत्रात
पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले, असे डोंगरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
पत्रातील आरोप काय?
– सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले.
– पिंपरीतील एका बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले.
- आयुक्तांच्या वर्षपूर्तीनिमित राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा खर्च हिंजवडी आणि मावळमधील बांधकाम व्यवसायिकाने केला होता.
- राष्ट्रवादीशी संबंधित स्पर्श घोटाळ्याप्रकरणी एका पत्रकाराला लाखो रुपये देण्यास कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.