बाभूळगाव : इंदापूर तालुक्यातील व्यापारी, शेतकरी, मजुर व नोकरदार यांनी अवैध भिशीच्या धंद्यात कोट्यावधी रूपयांची बेकायदेशीर गुंतवणुक केल्याचा प्रकार इंदापूरात उघडकीस आला आहे. संबंधित भिशी चालकांनी दोनशे कोटी रूपया पेक्षाही जास्त रक्कम गोळा केली. व नंतर ती रक्कम संबंधितांना परत देण्यास नकार दिल्याने गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहे. या प्रकाराने व्यथित झालेल्या शेकडो भिशी सदस्य रस्त्यावर उतरले आहेत. तहसिल कार्यालय व इंदापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत भिशी चालकांविरूद्ध फसवणुक केल्याचा तक्रार अर्ज दिला आहे.
गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, उषाप्पा मारुती बंडगर, शंकर मारुती बंडगर, उत्तम मारुती बडगर, नारायण साहेबराव वाघमोडे, परशुराम मारुती वाघमारे (सर्व रा. इंदापूर,अंबिकानगर), गोविंद रामदास जाधव (रा.लोहार गल्ली), महादेव दशरथ हराळे, राजु वसंत शेवाळे, विजय शिवाजी शेवाळे, अजय शिवाजी शेवाळे, गणेश शिवाजी शेवाळे, धनंजय भागवत कांबळे सर्व (रा. रोहिदासपथ चांभार गल्ली) सचिन लक्ष्मण कुंभार (रा.कुंभार गल्ली) काशिनाथ एकनाथ म्हेत्रे (रा.सरस्वती नगर) संजय चंद्रकांत गानबोटे (रा.अंबिका नगर), संतोष बाबुराव झींगाडे (रा. मेंन पेठ), प्रशांत सरेश कुंभार.(रा.आयटी आय पाठीमागे इंदापूर) अशी फसवणूक करणाऱ्या अवैध भिशी चालकांची नावे आहेत.
वरील सर्वांनी भिशी ही संकल्पना गैरव्यवहार व आर्थिक फसवणुक करण्यासाठी अस्तित्वात आणली. या माध्यमातुन शेकडो लोकांचा विश्वासघात केला आहे. कोट्यावधी रूपयांची आर्थिक माया जमा केली असून त्यातून त्यांनी स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी करत मोठ्या प्रमाणात पैशाची लुट केली आहे. भिसी सदस्यांनी भिसी चालकांकडे वारंवार पैशाची मागणी केली असता आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा,अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.
''इंदापूर पोलीस ठाण्यात अवैध भिशी फसवणुकीबाबत तक्रार अर्ज दाखल झाला आहे. सदर प्रकरण हे सहाय्यक निबंधक कार्यालय इंदापूर यांच्याशी निगडीत आहे. भिसी चालकांनी भिसी चालविण्याबाबतचे परवाना घेतला आहे का? या बाबत व इतर कायदेशीर बाबींची चौकशी करून सहाय्यक निबंधक यांच्याकडील आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येइल असे इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी सांगितले.''