अकरावी प्रवेशासाठी घेतली जाणारी सीईटी न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे इयत्ता दहावीच्या गुणांवरच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावी प्रवेशासाठी अर्ज आत्तापर्यंत २८४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे सध्या प्रवेशासाठी ९७ हजार ४५३ जागा उपलब्ध आहेत. मात्र, त्यात वाढ होऊ शकते.
मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी १ लाख ७ हजार जागा उपलब्ध होत्या. गेल्या वर्षी ७१ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर अकरावीच्या ३५ हजार ४९३ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला होता. यावर्षी सुध्दा सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळेल, याबाबत काळजी घेतली जाईल, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना काही विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यात सुधारणा करावी, या मागणीचे निवेदन मनविसेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी माध्यमिक शिक्षण संचालकांना दिले. मात्र, विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या कोणत्याही तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या नाहीत, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.