पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएमएल) वर्षभरात २० हजार १६५ तक्रारी आल्या असून, यातील ८० टक्क्यांहून अधिक घटनांत कोणतीही ठोस कारवाई न करताच तक्रारींची फाइल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीचे तक्रार निवारण केंद्र केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पीएमपीकडे पाहिले जाते. दररोज सुमारे दहा ते बारा लाख प्रवासी पीएमपी बसने प्रवास करत असतात. थांब्यावर बस थांबवली नाही, थांब्यावर गाडी उशिरा आली, चालक-वाहकांनी प्रवाशांशी गैरवर्तन केले, गाडी अस्वच्छ होती, चालक मोबाइलवर बोलत होता, गाडी वेगाने चालवली यासारख्या विविध अडचणी प्रवासादरम्यान येत असतात. या अडचणी तक्रार निवारण केंद्रावर फोन करून, एसएमएस, ई-मेल किंवा पीएमपीच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदवल्या जातात. मागील वर्षभरात पीएमपी प्रशासनाकडे अशा २०,१६५ तक्रारी आल्या आहेत. यातील २० हजारहून अधिक तक्रारी सोडविल्याचे प्रशासनाने सांगितले. पण, प्रत्यक्षात यातील बऱ्याच तक्रारी या न सोडवताच बंद केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
...अशी आहे प्रक्रिया
प्रवाशांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र उभारले आहे. ऑनलाइन तक्रार नोंदवल्यानंतर ती नोंदवल्याचा एसएमएस येतो. त्यानंतर कंट्रोल रूममध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आगार स्तरावर पाठविल्या जातात. तेथे त्या सोडवल्या जातात. एखादी तक्रार आगार पातळीवर सोडविण्यात आली नाही तर सहव्यवस्थापकीय संचालकांकडे येते. तेथेही ती सोडवली नाही तर पीएमपीचे अध्यक्ष स्वत: लक्ष देऊन ती सोडवतात, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
वर्ष, तक्रारींची संख्या
२०२२ - १०,८३५
२०२३ - २०,१६५
एकूण - ४०,९६०
इथे करा तक्रारी
फोन क्रमांक - ०२०-२४५४५४५४
ई-मेल आयडी - complents@pmpml.org
एसएमएस- ९८८१४९५५८९
तक्रार निवारण व्यवस्थेचा मूळ उद्देश तक्रारी कमी करून सेवेची गुणवत्ता वाढवणे हा असला पाहिजे. तक्रारीच्या मूळ कारणांचा शोध घेऊन वारंवार येणाऱ्या तक्रारींवर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. आजतरी पीएमपी प्रशासन कोणताही ठोस उपाय न करता तक्रारी बंद करण्यावरच भर देत आहे.
- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच, मानद सचिव