पुणे : लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी देशासह पुणे जिल्ह्यातही पार पडला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी ११,३०० व्हायल म्हणजेच १ लाख १३ हजार डोस प्राप्त झाले होते. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी त्यापैकी ३८० व्हायल वापरल्या. पहिल्या दिवशी ५८ टक्के लसीकरण झाले. एक बाटली उघडल्यावर चार तासांत वापरणे आवश्यक असल्याने लाभार्थी वेळेत न आल्यास काही डोस वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, काही डोस वाया जाण्याचे प्रमाण गृहित धरलेले असते, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
मार्च महिन्यापासून कोरोनाशी लढा सुरू असतानाच लसीकरण सुरू झाल्याने सर्वांनाच काहीसा दिलासा मिळाला. शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात लसीकरण पार पडले. त्यासाठी जिल्ह्याला १,१३,००० डोस प्राप्त झाले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ५८ टक्केच लसीकरण झाले. अनेक लाभार्थी विविध अडचणींमुळे अनुपस्थित राहिले. त्यामुळे काही डोस वाया गेले असले, तरी फारसे नुकसान झालेले नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--
जिल्ह्याला मिळालेले डोस - १,१३,०००
वापरलेले डोस - २,०२०
अपेक्षित लाभार्थी - ३,१००
लस देण्यात आलेले कर्मचारी - १,८०२
अनुपस्थित राहिलेले कर्मचारी - १,२९८
---
एका बाटलीत १० डोस
लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते, तसेच डोस भरतानाही काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्ट जातात.
--
घाबरू नका
लसीमुळे आपल्याला कोरोनापासून संरक्षण मिळते, हे सिद्ध झाले आहे. साधे इंजेक्शन किंवा लस घेतल्यानंतरही आपल्याला काहीशा वेदना होतात, सूज येते किंवा ताप, अंगदुखी यांसारखा त्रास होतो. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अफवांवर, गैरसमजांवर विश्वास न ठेवता लस घेण्यासाठी सर्वांनी एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
- डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय