पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. असंख्य रुग्ण हे लक्षणविरहित असल्याने गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वाढले असून शुक्रवारपर्यंत तब्बल २०६ झाले आहेत. त्यामध्ये ७८ इमारती आणि ९५ हाऊसिंग सोसायटी ३३ छोटे परिसर यांचा समावेश आहे.
पुणे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत इमारत, सोसायटी आणि छोटा परिसर असे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. चार किंवा पाच इमारती असणाऱ्या एखाद्या हाऊसिंग सोसायटी आणि छोट्या परिसरात २० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती सोसायटी आणि छोटा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली जाते. एखाद्या इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली जात आहे. इमारती किंवा सोसायटीमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या हातावर स्टॅम्प मारला जातो. तसेच दोन्हीच्या प्रवेशद्वारावर रुग्णांचे नावही लिहिले जात आहे. रुग्णांना या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून आत - बाहेर करण्यास सक्त मनाई आहे. तसे केल्यास महापालिकेकडून कारवाई केली जात आहे.
दररोज रुग्णांच्या संख्येत चढ - उतार होत आहे. त्यामुळे या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येतही बदल होणार आहेत. शहरातील सर्व क्षेत्र हे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सोपवण्यात आले आहेत. त्यानुसार आकडेवारीतही बदल होणार आहेत. पुणे शहरात सद्यस्थितीत २९ हजार ९८३ सक्रिय रुग्ण आहेत. काल दिवसभरात ३ हजार ५९४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणारे सक्रिय रुग्ण
हडपसर - मुंढवा रस्ता - ४४४ धनकवडी - सहकारनगर - ३१३ वडगाव शेरी - नगर रस्ता - २७९औंध - बाणेर - २४८ सिंहगड रस्ता - २४७ कोथरूड - बावधन - २४६ वारजे - कर्वेनगर - २२४बिबवेवाडी - २१९ कसबा - विश्रामबाग - २०३ कोंढवा - येवलेवाडी - १८६ शिवाजीनगर - घोले रस्ता - १५१ ढोले पाटील रस्ता - १४१ येरवडा - कळस - धानोरी - १२६ भवानी पेठ - १०८