पुणे : शहरातील मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी महत्त्वाकांक्षी जायका प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा २१ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता केंद्र शासनाकडून वितरीत करण्यात आला आहे. या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया तपासण्यासाठी केंद्राकडून सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्याला आणखी महिना लागणार असून, त्यानंतर निविदा निघतील, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली.जपान सरकारच्या जायका कंपनीकडून मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी केंद्र शासनाला ९०० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याची परतफेड केंद्र सरकारच करणार असून, पालिकेला ते निधी स्वरूपात दिले जाणार आहे. केंद्राकडून या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च उचलला जात असल्याने याच्या निविदा प्रक्रिया तपासण्यासाठी केंद्राकडून सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. जायका प्रकल्पासाठी केंद्राकडून पहिला हप्ता ५ कोटी रुपयांचा देण्यात आला होता, त्यानंतर आता २१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित ८५० कोटी रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने अदा केली जाईल. जायका प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर सध्या नद्यांना आलेले नाल्यांचे स्वरूप बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी केंद्र शासनाकडून सल्लागाराची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडून या निविदा तपासून घ्याव्या लागणार आहेत. पालिकेच्या वतीने निविदा तयार करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या सल्लागारांची नियुक्ती होताच त्या तपासून घेतल्या जातील. या प्रक्रियेला आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.११ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणाशहरात जायका प्रकल्पांतर्गत सांडपाणी शुद्धीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार आहे. शहरात तयार होणारे सर्व सांडपाणी शुद्ध होऊनच नदीमध्ये जावे यासाठी आणखी ११ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प याअंतर्गत उभारले जाणार आहेत. त्याबरोबर १०० किमी लांबीची ड्रेनेजलाइन टाकली जाईल. पालिकेच्या वतीने या प्रकल्पाची १३ कामांमध्ये विभागणी केली आहे, त्यासाठी १३ निविदाही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
जायका प्रकल्पासाठी केंद्राकडून २१ कोटी
By admin | Published: September 30, 2016 4:52 AM