लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहर पोलीस व वाहतूक शाखेने मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. विनामास्क फिरणाऱ्या ४ लाख ४९ हजार १४२ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून २१ कोटी ८९ लाख ३२ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. त्याचबरोबर वाहतूक शाखेने नियमभंग करणाऱ्यांवर १ जानेवारीपासून २० जूनपर्यंत तब्बल १४ लाख ७१ हजार ७१ जणांवर विविध कलमांखाली कारवाई केली आहे. त्यांच्यावर ५८ कोटी ४१ हजार ६४ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सर्वाधिक कारवाया विना हेल्मेटच्या
शहरातील चौकाचौकांत बसविणाऱ्या सीसीटीव्हीमार्फत विना हेल्मेट दुचाकी वाहनचालकांवर कारवाई केली जाते. या वाहनचालकांना त्याची पावती थेट त्यांच्या मोबाईल नंबर व घरच्या पत्त्यावर पाठविली जाते. शहरात आतापर्यंत ८ लाख ५४ हजार ६९९ दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर ४२ कोटी ७३ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
विना लायसन्स वाहन चालविणाऱ्या १२ हजार ७४४ जणांवर कारवाई केली असून त्यांच्यावर ६३ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या १० हजार ८०० जणांवर कारवाई केली गेली आहे. त्यांच्यावर २१ लाख ६० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये मोबाईलवर बोलणाऱ्या २१ हजार ८५१ जणांवर कारवाई केली होती. तरीही वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आला. तरीही नागरिक विनामास्क फिरतात. तसेच मास्क व्यवस्थित घालत नाही. अशांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. शहरात दुसरी लाट आल्यानंतर विनामास्क फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत होती. गेल्या महिन्यात तर काही दिवस दररोज ४ हजारांहून अधिकांवर कारवाई केली जात होती. कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झाला आहे. त्याबरोबर कारवाईची तीव्रता कमी झाली आहे. २० जून रोजी शहरात विना मास्क फिरणाऱ्या ९९५ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
........
१ जानेवारी ते २० जूनपर्यंत वाहतूक शाखेने केलेली कारवाई
नियमभंगाचा प्रकारकेसेसदंड
ट्रिपल सीट ५५८९ १११७८००
विना हेल्मेट ८५४६९९ ४२७३४९५००
मोबाईलवर बोलणे १०८०० २१६००००
विना लायसन्स १२७४४ ६३७२०००
एकूण केसेस १४७१०७१ ५८४१६४७००
पेड केसेस ३०५५८५ ७५२३२४००
मास्क केसेस ३७९४ १८९७०००
.....
नाकाबंदी करून दंड वसुली
वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी सातत्याने जागृती करण्यात येते. तसेच शहरातील रस्त्यांवर कमी गर्दीच्या वेळी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करून त्यांच्याकडून दंड वसुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे.