लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरात गांजाची वाहतूक करणारी मोटार पकडून अमली पदार्थविरोधी पथकाने २१ लाख ६० हजार रुपयांचा ६८ किलोचा गांजा जप्त केला आहे. जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दीपक भीमराव हिवाळे (वय २३), आकाश सुनील भालेराव (वय २७), आदित्य दत्तात्रय धांडे (वय १९), हिराबाई संतोष जाधव (वय ४०), सरूबाई रतन पवार (वय ६५), पार्वती सुरेश माने (वय ५७, सर्व रा़. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अमली पदार्थविरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हडपसर येथील श्रीनाथ वॉशिंग सेंटरसमोर एक कार उभी होती. पोलीस निरीक्षक खांडेकर, उपनिरीक्षक गवळी व अंमलदार यांनी चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना संशय आला. त्यांनी कारची झडती घेतल्यावर सीटच्या खाली दोन पोती व मागील सीटच्या खाली दोन पोती अशी चार पोती आढळून आली. पोती उघडल्यानंतर त्यात १३ लाख ६० हजार रुपयांचा ८६ किलो ५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. जालना येथून हा गांजा आणल्याचे आरोपींनी सांगितले. न्यायालयाने अधिक तपासासाठी चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.