पुणे : हडपसर परिसरात गांजाची वाहतूक करणारी मोटार पकडून अमली पदार्थ विरोधी पथकाने २१ लाख ६० हजार रुपयांचा ६८ किलो गांजा जप्त केला आहे. जालना येथील ३ महिलांसह ६ जणांना अटक केली आहे.
दीपक भीमराव हिवाळे (वय २३), आकाश सुनिल भालेराव (वय २७), आदित्य दत्तात्रय धांडे (वय १९), हिराबाई संतोष जाधव (वय ४०), सरुबाई रतन पवार (वय ६५), पार्वती सुरेश माने (वय ५७, सर्व रा़ जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या हडपसर येथील श्रीनाथ वॉशिंग सेंटरसमोर एक कार उभी होती. पोलीस निरीक्षक खांडेकर, उपनिरीक्षक गवळी व अंमलदार यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना संशय आला. त्यांनी कारची झडती घेतल्यावर सीटच्या खाली दोन पोती व मागील सीटचे खाली दोन पोती अशी चार पोती आढळून आली. त्याचा वास गांजा सारखा उग्र स्वरुपाचा होता. पोती उघडल्यानंतर त्यात १३ लाख ६० हजार रुपयांचा ८६ किलो ५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. जालना येथून हा गांजा आणल्याचे आरोपींनी सांगितले. न्यायालयाने अधिक तपासासाठी चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.