आळेफाटा : येथील एसटी बसस्थानकात कल्याणकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना चोरट्याने संगमनेर येथील सराफाचे रोख रकमेसह ३८७ ग्रॅम सोने असा सुमारे २१ लाखांचा ऐवज लांबविला. रविवारी (दि. ५) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आळेफाटा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. आळेफाटा पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, संगमनेरच्या बाजारपेठेत असणारे ‘मेहता ज्वेलर्स’चे आशिष रमेशचंद्र मेहता हे सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी आळेफाटामार्गे कल्याणकडे जात होते. आळेफाटा येथून ते कल्याणकडे जाण्यासाठी अहमदनगर-कल्याण बसमध्ये चढत होते. चोरट्यांनी त्यांच्या खांद्यावर असलेली बॅग मागील बाजूने कापून बॅगमध्ये असणारी रोख रक्कम तसेच विविध दागिने तयार करण्यासाठी लागणारे ३८७ ग्रॅम सोने असा सुमारे २१ लाखांचा ऐवज लांबविला. बॅग गेल्याचे आशिष मेहता यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केला; मात्र तोपर्यंत गर्दीचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले होते. आशिष मेहता यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. जे. कुंभार पुढील तपास करत आहेत. (वार्ताहर)
आळेफाटा येथे बसमध्ये चढत असताना २१ लाखांचे सोने लंपास
By admin | Published: April 08, 2015 3:41 AM