चंदननगर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आगाखान पॅलेसचे आकर्षण आजही भारतासह जगभरातील नागरिकांना आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षात तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी आगाखान पॅलेसला भेट दिली. यामध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक लोक हे परदेशी नागरिक असल्याची माहिती आगाखान पॅलेसची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यात महात्मा गांधीजी यांचे तब्बल २१ महिने वास्तव्य असलेले पुण्यातील एकमेव ठिकाण म्हणजे नगररस्त्यावरील आगाखान पॅलेस. येरवड्यापासून नगररस्त्याने पुढे आल्यावर रामवाडीगावजवळ आगाखान पॅलेस आहे.
इ.स १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या काळात ९ ऑगस्ट, १९४२ ते ६ मे, १९४४ दरम्यान महात्मा गांधीजींसह त्यांची पत्नी कस्तुरबा व सचिव महादेवभाई देसाई यांना या महालामध्ये नजर कैद ठेवण्यात आले. नजर कैदेत असताना कस्तुरबा गांधी (मृत्यू - २२ फेब्रुवारी १९४४) व महादेवभाई देसाई (मृत्यू - १५ ऑगस्ट १९४२) कालवश झाले. त्यांची समाधी स्थळे महाल परिसरात आहे. हा महल गांधीजींच्या आयुष्यात एक यथार्थ स्मरण आहे. महलामधील संग्रहालयात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाशी निगडित चित्र व छायाचित्रांचा मोठा संग्रह आहे. त्याचबरोबर, कपडे, भांडी, जपाची माळ, चपला, चरखा यांसारखे वैयक्तिक वापरातील वस्तू, तसेच सचिवांच्या मृत्युसमयी गांधीजींनी लिहिलेले पत्र अशा विविध वस्तू येथे पाहायला मिळतात, तसेच गांधीजींच्या अस्थींचे काही अवशेष, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांच्या समाधीजवळ ठेवण्यात आलेले आहेत.
तब्बल १६ एकर जागेतील महालामध्ये जवळपास एकरभर जागेत तीन मजली महाल असून, उर्वरित जागेत उद्यान आहे. प्रशस्त पार्किंग, शंभर वर्षे जुनी वडाची झाडे ही इतिहासाची आठवण करून देतात. हा पॅलेस नागरिकांना पाहण्यासाठी सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:३० दरम्यान खुला असतो. पंधरा वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश आहे, तर त्यापुढील प्रत्येक नागरिकाला २५ रुपये शुल्क आहे, तर परदेशी नागरिकांनी ३०० रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच आकारले जाते. पुरातत्त्व विभागाचे गजानन मंडावरे व विद्याधर सूर्यवंशी यांच्या निरीक्षणाखाली तब्बल ३० कर्मचारी या मालाची देखभाल दुरुस्ती सुरक्षेचे काम पाहतात, तसेच महालामध्ये गांधी खादी ग्राम उद्योगांतर्गत खादीचे कपडे, पुस्तके उपलब्ध आहेत.
मोहम्मद शहा आगाखान यांनी १८९२ बांधला हा महाल
गांधी राष्ट्रीय स्मारक या नावाने प्रसिद्ध असलेल्या आगाखान महालाची निर्मिती शिया इस्माइली संप्रदायाचे ४८ वे इमाम सुलतान मोहम्मद शहा आगाखान (तिसरे) यांनी इ.स. १८९२ मध्ये १६ एकर जमिनीमध्ये केली. आजूबाजूच्या परिसरातील दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना रोजगाराचे साधन मिळावे, म्हणून त्यांनी हा महाल बांधला. महालाचे बांधकाम पाच वर्षे चालले व त्या काळी १२ लाख रुपये खर्च करण्यात आला. या अवधीत एक हजार लोकांच्या गरजा रोजगाराने पुरविल्या गेल्या व त्यासाठी त्यांना भरपूर मजुरी देण्यात आली. इ.स १९६९ मध्ये राजपुत्र शाह करीम अल् हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी हा महाल आणि आसपासची जमीन, गांधीजी व त्यांच्या विचारांच्या स्मृतीत गांधी स्मारक निधी भारत सरकार यांना दान केली. आगाखान महाल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे राष्ट्रीय स्मारक आहे.