बारामती : छापील किमतीपेक्षा केवळ १ रुपया जादा लावणाऱ्या विक्रेत्याला तब्बल २१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य अॅड. तुषार झेंडे यांच्या तक्रारीवरून बारामती विभागाच्या वैध मापन शास्त्र निरीक्षकांनी ही कारवाई केली. बारामती येथील संगणक क्षेत्राशी निगडित सहित्यविक्री करणाऱ्या दुकानातून अॅड. झेंंडे यांनी ६९९ रुपये किमतीची प्रिंटरच्या शाईची बाटली विकत घेतली. त्यावर छापील किंमत ६९९ असताना त्या व्यावसायिकाने अॅड. झेंडे यांच्याकडून ७०० रुपये घेतले. झेंडे यांनी यावर ६९९ एमआरपी असल्याचे त्या व्यावसायिकाच्या निदर्शनास आणले; मात्र ‘आम्ही ७०० रुपयेच घेतो,’ असे सांगून ती रक्कम घेऊन त्याचे बिल व्यावसायिकाने दिले. त्याची ही कृती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार झेंडे यांनी वैधमापन निरीक्षकांकडे केली. त्याची दखल घेऊन त्या व्यावसायिकाला २१ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या व्यावसायिकासह बारामती शहरातील काही कापड दुकानांवरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात आली.शहरातील एका मॉलमधून लहान मुलांची खेळणी आणि इतर दोन वस्तू अशा एकूण ३ वस्तूंची खरेदी केली. त्या आवेष्टित वस्तूवरील छापील किंमत ७९ रुपये होती. मात्र, या वस्तूचे १७० रुपये घेण्यात आले. या मॉलमध्ये अनेक खेळण्यांवरील छापील किंमत खोडून निळ्या रंगाच्या पेनाने नव्ीान जास्त किमती लिहिलेल्या आहेत. याबाबतदेखील झेंडे यांनी तक्रार केली आहे. अॅड. झेंडे यांनी सांगितले, की सध्या बाजारपेठेत छापील किमतीपेक्षा जास्त किंमत आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे. (प्रतिनिधी)
१ रुपयासाठी बसला २१ हजाराचा दंड!
By admin | Published: March 28, 2017 2:21 AM