पुणे : पुणे महापालिकेत तब्बल ११ जणांना नोकरी लावण्याच्या आमिषाने २२ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे़ याप्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून हे एक मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे़
विशाल सुरेश शेंडगे (वय ३४, रा. कल्याण) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ याप्रकरणी एका २९ वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना आॅक्टोबर २०१३ ते आॅक्टोबर २०१५ या दोन वर्षाच्या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडगे याने ही महिला व इतर अकरा जणांचा विश्वास संपादन करून पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. ही महिला व इतर मुलांचे बीएस्सी, बारावी असे शिक्षण झाले आहे़ त्यांना त्याने व त्याच्या साथीदाराने क्लार्क, शिपाईपदाची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी २ लाख रुपये घेतले़ आॅक्टोबर २०१५ पर्यंत तो या सर्वांना टोलवत राहिला़ त्यानंतर त्याचा फोन बंद झाला व त्याने घरही बदलले़ त्यानंतर ही सर्व मुले त्याचा शोध घेत होती़बुधवारी विशाल शेंडगे हा स्वारगेट येथे आला असल्याची माहिती त्यांना मिळाली़ तेव्हा या सर्व मुलांनी तेथे जाऊन त्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले़ शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात नेले़