पुणे - जिल्ह्यातील पानशेत येथे राहणाऱ्या अनंता डोईफोडेला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी सायकल भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांसह अनंत याची भेट घेतली. त्यावेळी, नवी सायकल अन् शैक्षणिक साहित्य भेट देऊन अनंताला मदत केली. तसेच, यापुढेही त्याचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण त्याला मदत करणार असल्याचं पार्थ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं.
पुणे जिल्ह्यातील पानशेत या दुर्गम भागात राहणाऱ्या अनंता डोईफोडे याने दहावीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवले. मात्र, अनंताच्या शिक्षणाची कथा निश्चितच इतर मुलांप्रमाणे नाही. कारण, आपल्या शाळेत पोहोचण्यासाठी अनंताला आजही दररोज 4 तास पायपीट करावी लागते. घरापासून 11 किमी अंतरावर असलेल्या शाळेत जाऊन अनंताने आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले. दररोज 22 किमी अंतर पायाने कापून त्याने मेहनत व कष्टाने हे यश मिळवले आहे. त्यामुळेच, पार्थ पवार यांनी अनंताची भेट घेऊन त्याच्या कष्टाचं आणि यशाचं कौतुक केलंय. अनंताल भविष्यात आयएएस अधिकारी व्हायचयं, त्याच्या प्रयत्नातून तो नक्कीच तिथपर्यंत मजल मारेल, अशा विश्वासही पार्थ यांनी व्यक्त केला आहे.
दहावीला असताना मी दररोज पहाटे 4 वाजता उठून सकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास करत असे. त्यानंतर, 1 तास झोपून पुन्हा शाळेला जाण्यासाठी तयार होत. तर, शाळेतून परत आल्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे. अनंताची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असून घरातील ३ भावंडांमध्ये तो सर्वात मोठा आहे. त्याचे वडिल हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात. अनंताने दहावीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवले असून आता पुढील शिक्षणासाठी तो पुण्याला जायची इच्छा व्यक्त करत आहे. भविष्यात युपीएससी परीक्षेतून अधिकारी होण्याचं स्वप्न अनंताने बाळगलं आहे.