पुणे : महापालिकेच्या पेशवे पार्कसह विविध वाहनतळावर नागरिकांची सर्रास लूट सुरू हाेती. याबाबतचे वृत्त ‘लाेकमत’ने प्रसिद्ध करताच महापालिकेने आठ वाहनतळांची निविदा रद्द केली. तसेच ठेकेदाराकडील वाहनतळाचा ताबा काढून घेतला असून, या वाहनतळाची नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वाहनतळे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. तसे फलकही वाहनतळावर लावले आहे. तसेच या वाहनतळाच्या तपासणीसाठी कनिष्ठ अभियंता, लिपिक, टंकलेखक यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आठ वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदाराची अनामतीचे २२ लाख रूपये जप्त करण्यात आले आहे.
पेशवे पार्क वाहनतळावर पावती ३ रुपयांची, प्रत्यक्षात वसुली १० रुपयांची केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. पुणे महापालिकेचे एकूण ३१ वाहनतळ आहे. त्यातील सदाशिव पेठेतील पेशवे पार्क, एनर्जी उघान, नवलोबा वाहनतळ, सिहंगडरोडवरील पु. ल. देशपांडे उघान येथील वाहनतळ, बिबवेवाडी येथील डिसिजन टॉवर येथील वाहनतळ, गुलटेकडी येथील साईबाबा मंदिराजवळील वाहनतळ, स्व. राजीव गांधी उद्यान प्राणिसंग्रहालय येथील वाहनतळ आणि कात्रज दूध डेअरीजवळील पीएमपीएमएल टर्मिनल येथील आठ वाहनतळाचा ठेका एकाच ठेकेदाराकडे होता.
या आठही वाहनतळासाठी नवीन निविदाप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वाहनतळ विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आठ वाहनतळ चालविणा०या ठेकेदाराच्या अनामतीचे २२ लाख रूपये जप्त करण्यात आले आहे,असे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर यांनी सांगितले.