पुणे : लोहगाव विमानतळावर कस्टम विभागाने आज २१ लाख ९६ हजार रुपयांचे सोने पकडले. दोन महिलांनी अंतर्वस्त्र व बनावट दूरचित्रवाणी संचातून हे सोने लपवून आणले होते.दोन्ही महिलांना अटक करण्यात आली. नजिया अल्ब्रार हुसेन (वय, २० रा. ट्रॉम्बे) व झरिनाबानू अली अब्बास मन्सूरी (वय ४०, रा. इमामवाडा, मुंबई) अशी या दोघींची नावे आहेत. लोहगाव विमानतळावर ही कारवाई झाली. दोन महिला दुबईहून सोने घेऊन येत असल्याची माहिती कस्टम विभागाला समजली. त्यावरून कस्टमचे अतिरिक्त आयुक्त के. पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला. (प्रतिनिधी) दुबईहून आलेल्या विमानातून लगबगीने बाहेर पडून घाईघाईत या दोन्ही महिला विमानतळाबाहेर पडण्याच्या गडबडीत होत्या. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हटकले व थांबण्याची सूचना केली. त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून त्यांना पकडले. नजिया हिने तिच्या ब्राच्या आत सोन्याच्या अनेक तारा लपवल्या होत्या, तर झरिनाने एका लहान दूरचित्रवाणी संचात सोन्याचा पत्रा आणला होता. सुमारे ७९५ ग्रॅम सोने त्यांनी आणले होते. ते जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.
लोहगाव विमानतळावर पकडले २२ लाखांचे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2015 3:14 AM